
संजीवनी धुरी-जाधव
मलखांब हा व्यायाम प्रकार आहे. त्याकडे कसरतींचा खेळ प्रकार म्हणूनही पाहिले जाते. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मलखांबकडे पाहिले जाते. १५ जून रोजी जागतिक ‘मलखांब दिन’ आहे. त्यानिमित्ताने मलखांब प्रशिक्षक डॉ. नीता ताटके यांच्याशी केलेली बातचित…
साधारण १८१८ आधी हैदराबादच्या निजामाकडे गुलाब आणि अली नावाचे दोन महाकाय पैलवान होते. ते बलदंड होते. त्यांची उंची सहा फूट होती. पुण्याकडे मजल दरमजल करत सगळय़ा ठिकाणी कुस्ती जिंकत ते पेशव्यांच्या दरबारात पोहोचले आणि पेशव्यांच्या दरबारात त्यांनी ‘आमच्याशी कुस्ती खेळून जिंकून दाखवा’ असे आव्हान दिले. तेव्हा तर कुस्तीला राज्यदरबारी प्रतिष्ठा होती. त्यावेळी पेशव्यांच्या दरबारात बावन्न पैलवान होते, पण त्यातल्या एकाचेही आव्हान स्वीकारण्याचे धाडस झाले नाही. तेव्हा पेशव्यांच्या दरबारी पुजारी असलेले बाळंभटदादा देवधर बोलले, हे आव्हान मी स्वीकारतो, पण मला थोडी मुदत हवी आहे. त्यांनी नाशिकला जाऊन वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने बाळंभटदादांना दृष्टांत दिला की, प्रत्यक्ष मारुतीराय त्यांना कुस्तीचे डाव शिकवतील. त्याप्रमाणे बजरंगबलीने दृष्टांत देऊन एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले अशी आख्यायिका आहे. ठरलेल्या वेळी ते पुण्याला परतले आणि अलीबरोबर कुस्ती खेळली आणि अलीचा अशाप्रकारे पराभव त्यांनी केला की गुलाब न खेळता पळून गेला. बाळंभट दादांनी ज्या ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला त्या खांबाला त्यांनी ‘मलखांब’ असे नाव दिले.
मलखांब हा नंतर स्वतंत्र खेळ खेळायला सुरुवात केली आणि मलखांबाच्या स्पर्धा होऊ लागल्या. त्यासाठी नियम तयार झाले. पण असं लक्षात आलं की, मलखांब हा केवळ कुस्तीसाठी किंवा स्पर्धेपुरता मर्यादित नाही आहे. मलखांबामध्ये असलेल्या सगळय़ा विविध प्रकारच्या ज्या हालचाली आहेत. मलखांबामध्ये बरीच स्थिर स्थिती आहे. त्याची बरीचशी योगासने आहेत. याच्यामध्ये वरखाली जाणे आहे. त्यामध्ये पाठीच्या कण्याला व्यायाम होतो. बाह्य स्नायूंचा व्यायाम होतोच पण अंतर्गत संस्थेचाही होतो. त्यात पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था आहे. मलखांब केल्यावर लवचीकतेत वाढ होते. वेग, क्षमता या सगळय़ा गोष्टींची वाढ मलखांबमध्ये होते. मलखांब हा प्रेक्षणीय खेळ असल्याचे नीता ताटके सांगतात. पुढे त्या सांगतात की, आताच्या काही वर्षांमध्ये रिऍलिटी शोजमध्ये मलखांब बघायला मिळतो. नाटकांमध्ये, नृत्यामध्ये, सर्कसमध्ये, रिऍलिटी शोजमध्ये मलखांबच पाहायला मिळतो. या सगळय़ा ठिकाणी मलखांबाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले जात असल्याचे ते सांगतात. आरोग्यासाठी मलखांब केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आरोग्यासाठी मलखांब फायदेशीरच असल्याचे ताटके सांगतात.
व्यायामशाळेत सकाळी चाळिशीवरील लोक मलखांब शिकायला येतात. पंचवीस-तीस नियमित सराव करायला येतात. उदय देशपांडे त्यांना निःशुल्क प्रशिक्षण देत असतात. मलखांब करणे सोपे नाही आहे. जेव्हा तो आपण करायला सुरुवात करतो तेव्हा त्यातले बारकावे लक्षात येतात. गुरुत्त्वाकर्षणाच्या विरोधात मलखांबावर चढावे लागते. मग ते खांबावर असो किंवा दोरीवर असो. जेव्हा लाकडी मलखांब करतात तेव्हा मांडीमध्ये पकडावा लागतो, दोरीचा करता तेव्हा पायाच्या बेचक्यामध्ये दोरी पकडावी लागते. अशा पकडीची सवय नसते. त्यामुळे हा ताण स्नायूंवर येतो. तो सुरुवातीला खरच त्रासदायक वाटतो. त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. रोजच्या सरावाने मलखांब नीट करता येतो. खरं तर मलखांब कोणत्याही वयामध्ये शिकता येतो असेही त्या सांगतात.
तंदुरुस्तीसाठी मलखांब
आताच्या काळात लहान वय असो, तरुण वय असो किंवा चाळिशी, पन्नाशी, साठीची माणसं, महिला असो; सगळय़ांना फिटनेसबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. फिटनेसचा कोअर स्ट्रेंथ हा गाभा आहे. कोअर स्ट्रेंथ चांगली असेल तर तंदुरुस्त आहात असे समजायला हवे. त्यामुळे अलीकडे तंदुरुस्तीसाठी अनेक लोक मलखांब शिकायला यायला लागले आहेत. आमच्या समर्थ व्यायामशाळेत पाच वर्षांचा मुलापासून एWशी वर्षाच्या आजोबांपर्यंत मलखांब शिकायला येतात. कारण त्यांना तंदुरुस्त राहायचे आहे. या सगळय़ांचाच उद्देश काही स्पर्धा खेळायचा असा नसून तंदुरुस्त आरोग्याचा असल्याचे नीता ताटके सांगतात.























































