अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

उमरी शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिघांनी अत्याचार केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी उमरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उमरी शहरातील व्यंकटेशनगरातील एका अल्पवयीन पिडीत मुलीच्या घरी तीन तरूण रात्रीच्यावेळी गेले. त्यांनी तिला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला. हे प्रकरण समजताच व मुलीने आपल्या आईला याबाबत सांगताच पिडीत मुलगी आणि तिची आई आज सकाळी उमरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगून यासंदर्भात रितसर तक्रार नोंदवली. यावरून पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली. तथापि पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती उघड केली नाही. पोस्को कायद्याअंतर्गत सदरील घटना गुपित ठेवावी लागते असे पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले. परंतु या सामुहिक बलात्कार प्रकरणात या तिघापेक्षा अजून काही जण असल्याची चर्चा परिसरात आहे.

विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील पिडीत मुलगी असल्याने गुन्हा र.न.१९५/०१८ कलम ३७६ तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलीस निरीक्षक अभिमन्यू सांळुके यांनी बोलतांना सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पिडीत मुलीची येथील ग्रामीण रूग्णालयात तपासणी करण्यात आली असून महिला दक्षता समितीच्या सदस्या, महिला पोलीस कर्मचारी पिडीत मुलीसोबत आहेत. भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ए.बी.देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.