मालवणात धामधूमीत बाप्पाचे विसर्जन

327

– अनंत चतुर्दशी व अकरा दिवसांच्या  गणपती बाप्पांना गुरुवारी  मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली ती रात्रौ उशिरा पर्यंत सुरु होती. ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’…. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर यावेळी दिसून आला.

विसर्जन ठिकाणी नगर पालिका प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने सुलभ मूर्ती विसर्जनसाठी सुविधा दिल्या होत्या. पालिकेच्या वतीने किनारपट्टीवर निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासनानेही सर्वच विसर्जन मार्ग व किनारपट्टीवर बंदोबस्त ठेवला होता.

समुद्र किनारे, नदी, तलाव, वहाळ, गणेशघाट आदी ठिकाणी प्रथेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी ठिकठिकाणी दिसून येत होती.  बॅंजोसह अन्य वाद्य मिरवणुकात दिसून आली. सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली. मालवण बाजारपेठ येथून गणपती विसर्जनाच्या निघालेल्या मिरवणूक आकर्षण ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या