सामना प्रतिनिधी। मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी रात्री चोरट्यानी मालवण शहराला लक्ष्य केले. धुरीवाडा बोर्डिंग ग्राऊंड मार्गावरील एक बंगला व दोन दुकाने तसेच पोस्ट कार्यालयासमोरील एक दुकान चोरट्यानी फोडले.
दरम्यान तीनही दुकानातून किरकोळ रक्कम चोरीला गेल्याने दुकान मालकांनी पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले तर बोर्डिंग ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या बंद बंगल्याचे मालक मुंबईला असल्याने शेजारील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मालवण शहरातील बोर्डिंग ग्राऊंड साई मंदिर जवळ रस्त्यालगत खोत कुटुंबीयांचा माऊली हा बंगला आहे. मालक मुंबईला असल्याने बंगला बंद असतो तर बंगला परिसराची सफाई अनिल खोत करतात. खोत हे सायंकाळी साफसफाई करण्यास आले असता त्यांना बंगल्याचे दरवाजाचे उघडलेले दिसले. तसेच खिडकीचे लोखंडी ग्रीलही तोडलेल्या अवस्थेत होते. याबाबत बंगल्याच्या मालकांना माहिती देण्यात आली. तसेच पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सायंकाळी उशिरा पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी बंगल्याची पाहणी केली असता बंगल्यातील दोन कपाटे फोडलेल्या स्थितीत दिसून आले. मात्र मालक मुंबईला असल्याने नक्की किती मुद्देमाल चोरीस गेला हे कळू शकले नाही. खोत कुटुंबीय मुंबईवरून आल्यानंतर रीतसर तक्रार नोंदवून घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.






























































