बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यावर तृणमूल काँग्रेस नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जोरदार पलटवार केला. मी खेळाडू नाही. पण खेळ कसा खेळतात हे मला चांगलेच ठाऊक आहे. याआधी मी लोकसभेत सर्वात चांगली खेळाडू होती. त्यामुळे आमचा बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हातात कदापि देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दक्षिण दिनाजपूर येथील प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी, शहांवर हल्लाबोल चढवला. आम्ही गुजरातला आमच्या राज्यावर कब्जा करायला आणि दिल्लीतून सरकार चालवायला अजिबात देणार नाही. बंगालवर बंगालचेच राज्य असेल. भाजपचे नेते आपल्या प्रचारसभांमधून बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार बनवण्याच्या हेतूने राज्यातील जनतेला आवाहन करीत आहेत. याचा अर्थ असा की केंद्र आणि राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असावे, असा भाजपचा मनसुबा आहे. हा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.