
सामना ऑनलाईन । मुंबई
दुबईचे दोन व्हिसा बाळगणाऱ्या एका तरुणाला बुधवारी सहार विमानतळावर अटक करण्यात आली आहे. अमित गमरे (३५) असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईहून दुबईला जायला निघाला होता.
पोलिसांनी अमितची तपासणी केली असता त्याच्याकडे दुबईचे दोन व्हिसा सापडले. त्यातील एक व्हिसा कामासाठीचा तर दुसरा पर्यटनाचा व्हिसा होता. जेव्हा अमित इमिग्रेशनची तपासणी पूर्ण करत होता तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याचा पासपोर्ट हा इसीआर विभागांतर्गत येत असल्याचं लक्षात आलं. इसीआर म्हणजे इमिग्रेशन चेकिंग रिक्वायर्ड विभाग. या विभागात ज्यांचे पासपोर्ट येतात त्यांना इमिग्रेशन प्रोटेक्टर प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं. मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अतिशय वेळखाऊ असल्याने अनेकजण दुबईला जाण्यासाठी पर्यटनाच्या व्हिसाचा वापर करतात.
अमितकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.





















































