
कुशीनगर एक्सप्रेसमध्ये हत्या करून फेकलेल्या अल्पवयीन मुलाच्या मारेकऱ्याला लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विपुल शहा असे आरोपीचे नाव असून तो मृत मुलाचा मावस भाऊ आहे. विपुलला काही दिवसांपूर्वी त्याची मावशी ओरडली होती. त्या रागातूनच त्याने मावशीच्या मुलाचीच गळा चिरून हत्या केली होती.
विपुल व त्याच्या मावशीचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी मावशी त्याला कामचुकार म्हणाली होती. तसंच माझा मुलगा जर तुझ्यासारखा असता तर त्याला मारला असता असे देखील सुनावले होते. त्यामुळे विपुल मावशीवर भडकला होता व त्याने मावशीला धडा शिकवायचे ठरवले. विपुलने मावशीच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची गळा चिरून हत्या केली व त्याचा मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी बोगीतील शौचालयातल्या कचरा पेटीत टाकला होता.
शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांना कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी बोगीतील शौचालयातल्या कचरा पेटीत तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जब्बार तांबोळी व त्यांच्या पथकाने कसून शोध मोहिम राबवून आरोपी विपुल शहा याला वांद्रे कुर्ला मेट्रो यार्डातून अटक केली.