सायकल चोरून स्वस्तात विकायचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस संधी साधून शिताफीने सायकल चोरणारा एक सराईत चोरटा आणि या चोरीच्या सायकल स्वस्तात लोकांना विकणारा दुकानदार अशा दोघांना गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने पकडले आहे. आरोपीने केलेल्या सायकल चोरीचे सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत.

आग्रीपाडा, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सायकल चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-3 ने वाढत्या सायकल चोरीच्या गुह्यांची गंभीर दखल घेतली. प्रभारी निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शामराव पाटील व पथकाने सायकल चोरांचा शोध सुरू केला तेव्हा बोरिवलीपासून ते आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे आढळले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सायकल चोरीच्या गुह्यातील अभिलेखावरील आरोपी रईस तावर खान (47) याने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अखेर दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर रईस माहीममध्येच सापडला. सायकल चोरल्यानंतर तो अॅण्टॉप हिल येथील उगमलाल गौड ऊर्फ हुकूम (42) या सायकलवाल्याला विकत होता. मग त्या सायकली हुकूम थोडय़ा चढय़ा भावाने लोकांना विकायचा.