
सामना प्रतिनिधी । पूर्णा
परभणी शहरात किरकोळ कारणावरुन धारदार चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे एका तरुणाला तलवारीने व कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे या आरोपीकडून एअर पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. शहरात बॅनर फाडण्याच्या किरकोळ कारणावरुन अमोल तूरे या तरुणाचा धारदार चाकूने छातीत भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. चार दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती.
पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरातील कंठेश्वर येथे मोटारसायकल पळवताना धुळ का उडविली या क्षुल्लक कारणावरून गजानन धोत्रे या युवकास कुऱ्हाडी व तलवारीने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना 10 जून रोजी पूर्णा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी नामे सागर कामाजी खल्लाळ यास अटक करून त्याचे जवळुन काळ्या रंगाचे एक नळी असलेले एअर पिस्टल जप्त करण्यात आले आहे. दुचाकीवरून जातांना धुळ का उडविली या कारणावरून कुऱ्हाडीने घाव करून तलवारीने वार करण्यात आले. जनावरांसाठी वापरण्यात येणारी एअर पिस्टल मधून वार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गजानन याने चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सहा.पोलीस निरीक्षक बहात्तरे यांनी तपासची चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच सागर खल्लाळ या आरोपीस अटक करून त्यांच्याकडून एअर पिस्टलही जप्त करण्यात आले. कारवाई करणाNया पोलिसांच्या या पथकात चव्हाण, कोकलवार, कदम आदींचा समावेश होता.
























































