सासनकाठी नाचविताना विजेच्या धक्क्याने मानकऱ्याचा मृत्यू, कोरेगाव तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यादरम्यान देवाच्या मानाच्या सासनकाठीला महावितरण कंपनीच्या वहिनीचा धक्का बसल्याने सासनकाठीच्या मानकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ऐन यात्रेत सासनकाठीच्या मानकऱयाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. महेश बाळासाहेब माने (वय 28) असे मृत युवकाचे नाव आहे. ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त सोमवारी धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी सकाळी देवाची पालखी व मानाची सासनकाठी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने यांनी काठीला एलईडी दिव्यांच्या साहाय्याने विशेष सजावट केली होती.

ग्रामप्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर महेश माने यांनी ती नाचविण्यास सुरुवात केली. अचानक सासनकाठीचा महावितरण कंपनीच्या 11 के.व्ही.च्या वीजप्रवाह सुरू असलेल्या वीज वाहिनीला धक्का लागला. वीजप्रवाह काठीत उतरल्याने महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित माने यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, काठीचे मानकरी असलेल्या माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक होता. कोरेगावच्या डी. पी. भोसले कॉलेजमधून त्यांनी शास्त्र शाखेतून पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे. वडील सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर शेती करीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. वडिलांनंतर शेतीची जबाबदारी महेशवर येऊन पडली. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक होता.