
ऑस्ट्रियामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. शौचालयास गेलेल्या एका व्यक्तीच्या गुप्तांगाला अजगराने चावा घेतला आहे. यात 65 वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर व्यक्त्तीच्या शेजाऱ्य़ाने खूप सारे साप आणि अजगर पाळले होते. एक अजगर या व्यक्तीच्या घरात घुसला आणि चावला. या प्रकरणी शेजारील व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रिया मधील ग्राज शहरात एक 65 वर्षीय नेहमीप्रमाणे सकाळी शौचालयासाठी गेले. तेव्हा कमोडमध्ये काही हलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नंतर तो पाच फुटांचा अजगर असल्याचे समोर आले. व्यक्ती काही करणार तेवढ्यात या अजगराने या व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या गुप्तांगाला चावा घेतला.
त्यांच्या शेजारील व्यक्तीने भरपूर सारे साप आणि अजगर पाळले होते. त्यापैकी एक अजगर पाईपच्या माध्यमातून शेजारच्या घरात घुसला आणि या व्यक्तीला चावला.
खरंतर अजगर विषारी नसतात, परंतु हा अजगर शौचालयाच्या पाईपलाईनमधून गेला होता, म्हणून या व्यक्तीला विषाणूची लागण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी शेजारील राहणाऱ्य़ा व्यक्तीच्या घरात धाड घातली. तेव्हा पोलिसांना 11 प्रकारचे साप आणि अजगर आढळले. हे साप इकडे तिकडे जाऊ नये म्हणून या व्यक्तीने तसे पिंजरे बनवून घेतले होते. असे असताना हा अजगर शेजारील व्यक्तीच्या शौचालयात कसा पोहोचला याचा तपास केला जात आहे.




























































