चुकीच्या पद्धतीने गाडी मॉडिफाय केली, न्यायालयाने ठोठावली सहा महिन्यांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात गाड्या मॉडिफाय करायला बंदी आहे. पण, काही नियम पाळून आपण थोड्या प्रमाणात गाडी मॉडिफाय करू शकतो. पण, ते नियम मोडून जर गाडी मॉडिफाय केली तर शिक्षा होऊ शकते. असाच एक प्रकार जम्मू कश्मीरमध्ये घडला आहे.

जम्मू कश्मीर येथील महिंद्रा थार गाडीचा मालक आदिल फारूक भट याला वाहतूक न्यायालयाने अवैध मॉडिफिकेशन केल्यामुळे 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. जर आदिलने 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर दोन वर्षं चांगली वागणूक ठेवली तर त्याला कारागृहात जावं लागणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

आदिलने त्याची महिंद्रा थार ही गाडी मॉडिफाय केली होती. पण, त्यात अनेक नियम मोडण्यात आले होते. महिंद्रा थारचे जुने मॉडेल असल्याने या गाडीचं छप्पर बदलण्यात आलं आहे. गाडीचे टायर हे अधिक मोठ्या आकाराचे करण्यात आले. गाडीवर एलईडी लाईट्स आणि सायरन लावण्यात आला आहे असा दावा न्यायालयासमोर वाहतूक विभागाने करताना संबंधित पुरावेही सादर केले.

न्यायालयाच्या निकालानुसार गाडीची रचना ही पूर्णपणे किंवा अंशत: तिच्या मूळ स्वरूपाहून वेगळी करण्यात आली आहे. गाडीच्या मूळ नोंदणी प्रमाणपत्रातील (आरसी बूक) माहितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे बदल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आलं असून त्यासाठी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मात्र गाड्यांची रचना बदलण्यासंदर्भातील कायद्यामधील सूटही या आरोपीला मिळाली आहे. यापूर्वी आरोपी अशाप्रकारच्या कोणत्याही गुन्हामध्ये सहभागी नसल्याचं लक्षात घेत शिक्षा सुनावताना या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपीकडून दोन लाखांच्या कररापत्रावर पुढील दोन वर्षांसाठी या प्रकरणासंदर्भातील वर्तन हे कायद्याच्या चौकटीत राहणार असेल असं लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत. तर या कराराप्रमाणे आरोपीची वर्तवणूक नसेल तर त्याला ठोठावण्यात आलेली सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल.