कॉलेजमध्ये अॅडमिशनच्या नावाखाली १६ लाखांचा चुना

सामना ऑनलाईन । मुंबई

जुहू येथील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून १६ लाखांचा चुना लावणाऱ्या भामटय़ाला जुहू पोलिसांनी अटक केली. फेरीन हर्षदभाई पटेल असे या भामटय़ाचे नाव असून बुलेट रायडिंगच्या नादापोटी त्याने ही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. फेरीन हा मीरा रोड येथील रहिवासी असून जुहू येथील नामांकित कॉलेजमध्ये तो शिकला. याच कॉलेजमध्ये अॅडमिशन हवे असल्याने काही विद्यार्थ्यांनी त्याच्याशी संपर्प केला. माझी ओळख आहे, अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून फेरीन याने आधी आठ आणि नंतर आठ असे १६ लाख रुपये घेतले. पैसे मिळाल्यावर फेरीन याने पळ काढला. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याने जुहू पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. पोलीस उपायुक्त परमजित सिंग दहिया, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ निरीक्षक केदारी पवार, पोलीस निरीक्षक अशोक सावंत, उपनिरीक्षक अजय भोसले यांच्या पथकाने मीरा रोड येथून फेरीन याला ताब्यात घेतले. अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने फेरीनची रवानगी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या