सोनं समजून जपून ठेवलेला दगड निघाला त्याहून मौल्यवान, किंमत एवढी की मोजता-मोजता…

नशीब उजळणे कशाला म्हणतात हे तुम्हाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहणाऱ्या डेव्हिड होल (David Hole) नावाच्या व्यक्तीकडे पाहून समजू शकते. झाले असे की एका दगडाने या माणसाचे आयुष्य बदलून टाकले आहे. सोन्याचा समजून जो दगड डेव्हिडने जपून ठेवला होता तो सोन्याहूनही मौल्यवान निघाला आहे.

ऑस्ट्रेलियात डेव्हिड होल नावाच्या व्यक्तीने सोन्याचे खनिज समजून एक दगड गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरी लपवून ठेवला होता. बराच प्रयत्न करूनही त्याला या दगडात सोन्याचा अंश आहे की नाही हे समजू शकले नाही. अखेर त्याने मेलबर्न म्युझियममध्ये तज्ज्ञांना हा दगड दाखवला. हा दगड सोन्यापेक्षाही मौल्यवान असून तो अंतराळातून पृथ्वीवर आलेला एक उल्कापिंड आहे, असे तज्ज्ञांनी सांगताच डेव्हिडचा आनंद गगणात मावेनासा झाला.

ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये ही उल्का डेव्हिडला मेलबोर्नजवळील रीजनल पार्कमध्ये सापडली होती. 19 व्या शतकापासून या परिसरात सोने किंवा सोन्याचा अंश असलेले दगड मिळणे अगदी सर्वसाधारण झाले होते. मात्र, डेव्हिड होल याला सापडलेला दगड हा काहीसा वेगळा होता. त्याने हा दगड जवळपास 6 वर्षांपर्यंत स्वत:कडेच बाळगला.

डेव्हिडलाही वाटले की हा चमकदार दगड सोन्याचाच असावा. त्याने हा दगड फोडून पाहण्याचाही व्यर्थ प्रयत्न करून पाहिला होता. या दगडावर त्याने अॅसिडही ओतले. परंतु दगड काही फुटला नाही. अनेक वर्षे हा दगड त्याच्यासाठी एक रहस्यच बनून राहिला. अखेर हा दगड घेऊन तो मेलबर्न म्युझियममध्ये गेला. त्याने येथील तज्ज्ञांना हा दगड दाखवल्यानंतर तेही आश्चर्यचकीत झाले. हा दगड अब्जावधी वर्षांपूर्वीचा आहे. हा दगड एक प्रकारची उल्का आहे.

सिडनी मॉर्निंग हेरॉल्डशी चर्चा करताना संग्रहालयाचे वैज्ञानिक डेरमोट हेनरी यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ दोनच अस्सल उल्का दगड प्राप्त झाले आहेत. त्यापैकी हा एक आहे. या दगडाची किंमत एवढी आहे की ती मोजता-मोजता माणूस थकून जाईल.