धावत्या लोकलमधून दिव्यांग प्रवाशाला ढकलले; वांद्रे-माहीमदरम्यानची धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल ट्रेनमधील सीटवरून झालेल्या वादात आणखी एका प्रवाशाचा बळी गेला. चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने चाललेल्या धावत्या लोकल ट्रेनमधून 62 वर्षीय दिव्यांग प्रवाशाला खाली ढकलण्यात आले. त्यात गंभीर दुखापत होऊन प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. वांद्रे रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

चर्चगेटहून बोरिवलीला चाललेल्या धीम्या लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यात दोन प्रवाशांमध्ये सीटवरून वाद झाला. त्या वादातून 62 वर्षीय केजिटन पॉल डेनिस पिरिस यांना धावत्या लोकलमधून खाली ढकलले. पिरिस हे सांताक्रुझ पूर्वेकडील रहिवासी होते. ट्रेनमधून खाली कोसळल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ढकलून देणाऱया अमजद सफरुद्दीन शेख (48) या प्रवाशाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांमार्फत साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान लोकल ट्रेनमधील वादावादीचे प्रकार वाढल्याने प्रवासी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.