इडापीडा घालवतो सांगून भोंदू बाबाचा महिलेला गंडा, सोन्याचे दागिने घेऊन झाला पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असतात. तुमच्या घरात इडापीडा असून मी ती घालवतो, त्यासाठी तुमच्याकडील दागिन्यांची पूजा करावी लागेल, अशी बतावणी करून एका भामटय़ाने गृहिणीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता, परंतु याप्रकरणी गुन्हा दाखल होताच विनोबा भावे नगर पोलिसांनी तत्काळ तपास करून अंबरनाथमध्ये राहणाऱया भामटय़ाला पकडून आणले.

कुर्ला पश्चिमेकडील आंबेडकर नगरात सुहासिनी (नाव बदलले) ही गृहिणी कुटुंबीयांसह राहते. रविवारी सुहासिनी त्यांच्या मुलासह घरी असताना एक बाबा त्यांच्याकडे आला. तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असतं, तुमच्या मागे पीडा लागली आहे. तुमचे दागिने माझ्याकडे काढून द्या, त्याचे शुद्धीकरण करून देतो. मग तुमची आजच पीडा जाईल अशी बतावणी करत त्याने सुहासिनी यांना दागिने देण्यास शिताफीने तयार केले. आपलं चांगलं होतेय या हेतूने सुहासिनी यांनी त्यांचे मंगळसूत्र, अंगठी, कानातले असे दागिने काढून त्या बाबाकडे काढून दिले.

दागिने मिळताच त्या भामटय़ाने तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुहासिनी यांनी विनोबा भावे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी त्यांच्याकडील अभिलेख तपासला असता बजरंग भांडे (35) या भामटय़ाने 2016 मध्ये असा गुन्हा केला होता आणि त्यात त्याला अटक झाली होती. ही माहिती स्पष्ट होताच पोलिसांनी अंबरनाथ येथे राहणाऱया बजरंगचे घर गाठले. तेथे तो सापडल्यानंतर त्याला पकडून आणण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याने अशा प्रकारे अजून किती गुन्हे केलेत याचा पोलीस शोध घेत आहेत.