
‘हमको मिली उसकी सजा…हम जो खता कर ना सके’ या गाण्याच्या ओळी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, वास्तवात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने जो गुन्हा केलाच नव्हता, त्या गुन्ह्याच्या आरोपाखाली त्याला सुमारे 27 वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. आता चौकशीत त्या तरुणाचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला सरकारकडून 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एका हत्येप्रकरणी चेस्टर हॉलमॅन नावच्या कृष्णवर्णीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याला एक दोन वर्षे नव्हे तर सुमारे 27 वर्षे या हत्येप्रकरणी तुरुंगात डांबण्यात आले होते. मात्र, या प्रकरणातील सत्य उघड झाल्यावर चेस्टर याचा या हत्येशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याची 2019 मध्ये तरुंगातून सुटका करण्यात आली.
एका मुख्य साक्षीदाराने 1991 मध्ये खोटी साक्ष देत चेस्टरला या प्रकरणात गोवल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे आपण निर्दोष असूनही आपल्याला 27 वर्षे तुरुंगात डांबल्याचा आरोप करत चेस्टरने स्थानिक राज्य सरकारविरोधात खटला दाखल केला होता. त्याच्या याचिकेची दखल घेत फिलाडेल्फियाच्या राज्य सरकारने त्याला नुकसान भरपाई देण्याचे ठरवले. त्याला सुमारे 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
या प्रकरणी दोन्ही पक्षांनी सामंजस्याने या प्रकरणाचा निपटारा केला आहे. या कराराप्रमाणे राज्य सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या प्रकरणात चूक नसल्याचे मान्य करण्यात आले आहे. मुख्य साक्षीदाराची खोटी साक्ष आणि तत्कालीन परिस्थितीमुळे चेस्टरला 27 वर्षे तुंरुगात खितपत पडावे लागले. त्यासाठी राज्य सरकार चेस्टरला 72 कोटींची नुकसान भरपाई देत आहे, असेही करारात स्पष्ट करण्यात आले आहे.
या करार योग्य असल्याचे तसेच चेस्टरला निर्दोष मुक्त करून सन्मानाने ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र, कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्याची किंमत कितीही मोठ्या रकमेने होऊ शकत नाही, असे फिलाडल्फियाचे महापौर जिम केन्नी यांनी म्हटले आहे. या शिक्षेमुळे चेस्टरचे स्वातंत्र्य हिरावले गेले. त्याची किंमत करता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
सुमारे 28 वर्षांनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अनुभव सुखद असल्याचे चेस्टरने म्हटले आहे. हा करार आपल्यासाठी सुखद आणि खेदजनकही आहे. आपली उमेदीची वर्षे तुरुंगात गेली, याचा खेद आहे. तर आता उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता येणार असल्याचे समाधान आहे, असे त्याने सांगितले. तसेच या प्रकरणातील सत्य जगासमोर आल्याने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. त्याचा आनंद असल्याचेही त्याने सांगितले.
अनेकांनी जो गुन्हा केलेला नसतो, त्याची शिक्षा त्यांना का भोगावी लागते, हा प्रश्न आपल्याला पडला आहे. आपण तुरुंगात अशा अनेकांना भेटलो, ज्यांचा गुन्ह्याशी संबंध नाही, तरीही ते शिक्षा भोगत आहे. सत्याची लढाई खडतर असली तरी, त्यात सत्याचा विजय होतो. त्यासाठी अंतिम क्षणापर्यंत लढण्याची तयारी ठेवावी लागते, असेही चेस्टर याने सांगितले.
























































