
अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (19 रोजी) रात्री फिल्मी स्टाइल घडलेल्या या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे.
ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24, रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम पडोळे (रा. नगर) हा जखमी झाला आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्यांविषयी ओंकार याने तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे गणेश हा त्याच्यावर चिडून होता. सोमवारी रात्री एक वाजता ओंकार हा त्याचा मित्र शुभम पडोळे याच्यासोबत बालिकाश्रम रस्त्यावर थांबला होता. यादरम्यान गणेश हा त्याच्या दोन मित्रांसह तेथे आला. त्या तिघांनी मिळून ओंकार व शुभम यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला. यामध्ये ओंकार जागीच ठार झाला, तर शुभम हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी तलवारीचा धाक दाखवून तेथून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, भान्सी, उपनिरीक्षक समाधान सोळंके, टी. के. कानगुडे यांनी घटनास्थळी भेट
दिली आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक ओला यांना निवेदन
ओंकार भागानगरे याच्या खुनामुळे शहरातील वातावरण तापले होते. त्याच्या खुनाच्या कटातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज भागानगरे याच्या कुटुंबीयांसह सर्वपक्षीय लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले. यावेळी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, वसंत लोढा, ऍड. अभय आगरकर, माजी महापौर बाबा वाकळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


























































