
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
फडणवीस सरकारच्या आदेशानंतर यवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघिणीला शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच सरकारच्या या गोळीबाराची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी या तर मुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर कमालीच्या संतापल्या आहेत.
कायदेशीर आणि राजकीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात येईल असा इशारा देतानाच ‘अवनी’च्या एन्काऊंटरची सुपारी एका गँगस्टरला देण्यात आली होती, असा गंभीर आरोप मनेका गांधी यांनी केला आहे. अवनीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणिप्रेमींनी निषेध व्यक्त केलेला असतानाच मनेका गांधी यांनीही ट्विट करून या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मनेका यांनी संताप व्यक्त करताना एका पाठोपाठ एक ट्वीट केले आहे.
शाफतची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मनेका म्हणाल्या, शाफत अली यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे, काही हत्ती आणि 300 रानडुकरे मारली आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असतानाही फडणवीस सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी त्यांनाच का दिली? राष्ट्रविरोधी लोकांना ते अवैधपणे शस्त्र पुरवतात हेसुद्धा सर्वांना ठाऊक आहे. तरीही अमानवी आणि अवैध कृत्ये करण्यासाठी अशा लोकांना का बोलावले जाते, असा सवाल मनेका गांधी यांनी केला आहे.
हा गुन्हाच आहे!
मनेका म्हणतात, हा एक प्रकारे गुन्हाच आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकांनी विनंती करूनही त्यांनी अवनीला ठार मारण्याचे आदेश दिले. हे प्रकरण आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर जोरकसपणे मांडू. हैदराबाद येथील शार्पशूटर शाफत अली खान याला ‘सुपारी’ देणाऱ्या मुनगंटीवार यांच्यावर मनेका यांनी संताप व्यक्त केला आहे. वन्य जीवांच्या हत्येसाठी प्रत्येक वेळी शाफत अली यांनाच बोलावले जात होते आणि यावेळी अवनीला ठार मारण्यासाठी तर त्यांच्या मुलाला पाचारण करण्यात आले. हे बेकायदेशीर होते, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यात अवनीला दिसताक्षणीच गोळय़ा घालण्यात याव्यात असे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नरभक्षक वाघिणीला जीवनदान मिळावे यासाठी प्राणिप्रेमींनी ऑनलाइन याचिकांचा पाऊस पाडला होता. गेल्या तीन महिन्यांपासून अवनीला पकडण्यासाठी वन विभागाने जंग जंग पछाडले होते. त्यासाठी हुंगणारे कुत्रे, सापळे, ट्रॅप कॅमेरा, ड्रोन, तज्ञ ट्रॅकर्स, शार्पशूटर अशी अत्याधुनिक साधनसामुग्री आणि 200 जणांची टीम कामाला लावली होती. अखेर शार्पशूटर असगर अली याच्या बंदुकीने अवनीचा वेध घेतला. घटनास्थळी दुसऱ्या वाघिणीचे मूत्र आणि अमेरिकन परफ्युम शिंपडण्यात आले होते. ते हुंगत अवनी तिथे पोहोचली, अशी माहिती वन अधिकाऱ्याने दिली.
अवनीला ठार मारल्यानंतर वन विभागाचे पथक तिच्या दोन बछडय़ांचा शोध घेत आहे. अवनीसोबत राहणारा टी 2 नावाचा नर वाघ बछडय़ांसोबत आहे. भविष्यात त्याला त्याचे बछडे प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देऊ शकतात. म्हणून टी 2 वाघ या 10 महिन्यांच्या बछडय़ांवर हल्ला करू शकतो.
राष्ट्रीय वाघ बचाव प्राधिकरणाने जारी केलेल्या नियमावलीनुसार सुर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच वाघावर बेशुद्ध करणारी गोळी झाडण्यात येते. अवनीवर मात्र रात्री गोळी झाडण्यात आली. अवनीची निर्घृण हत्याच केली असून हा एकप्रकारे गुन्हाच आहे.
-मनेका गांधी, केंद्रीय मंत्री
summary- maneka gandhi slams sudhir mungantiwar over avnis death
























































