
गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना आंब्याची चव चाखता आली नाही. यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संकट कायम आहे़. अशावेळी चाकरमान्यांपर्यंत आंबा पोहोचवण्याचे काम रत्नागिरी एसटी विभाग करणार आहे. आंब्याच्या घाऊक वाहतूकीबरोबरच आंब्याची किरकोळ वाहतूक यंदा एसटीतून होणार आहे.
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात एसटीने अविरत सेवा दिली. रेल्वे बंद असताना एसटीचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. यंदाच्या वर्षापासून एसटीने आंबा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक आंबा वाहतूकीसाठी एसटी ट्रक उपलब्ध करुन देणार आहे. हे ट्रक ज्या ठिकाणी आंबा उतरवायचा आहे त्या ठिकाणापर्यंत सेवा देणार आहेत.
दोन चार डझनचे किरकोळ आंब्याच्या खोक्यांची वाहतूक यंदा एसटी करणार आहे. अनेकवेळा कुरियर सेवा उपलब्ध नसते किंवा आंब्याच्या दरापेक्षा कुरियरचाच खर्च अधिक होतो. एसटीतून होणारी किरकोळ आंबा वाहतूक ही एसटी बसस्थानकापर्यंत होणार आहे. त्या बसस्थानकातील कार्यालयातून आंबापेटी घेऊन जावी लागणार आहे.
मात्र ही सेवा कमी दर असल्यामुळे चाकरमान्यांनाही परवडणारी आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये आंबे मिळत होते. मात्र शेकडो पेट्यांमध्ये ऑर्डर केली तरच आंब्याची गाडी मुंबईत जात होती. यंदा मात्र एसटीमुळे किरकोळ आंब्यांची मागणी करता येणार आहे.
आंबा पाठवण्याच्या अधिक माहितीसाठी एसटी रत्नागिरी विभागाने काही संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत़. त्यामध्ये मंडणगड मोबा : 9762065400, दापोली मोबा : 7350515544, खेड मोबा : 9561358127, चिपळूण मोबा : 8855055667, देवरुख मोबा : 7507948701, गुहागर मोबा : 9822029294, रत्नागिरी मोबा : 9890041667, 9511899463, राजापूर मोबा : 9420155511, लांजा मोबा : 9657112554 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़.

































































