मणिपूरमध्ये सैन्याच्या तुकडीवर स्फोटकांचा हल्ला, 5 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूर येथे हिंदुस्थानी सैन्याच्या तुकडीवर स्फोटक हल्ला झाला असून या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. तर एका जवानाचे दोन कुटुंबीयही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. सैन्याच्या तुकडीवर पाळत ठेवून दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे.

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील सिंघाट येथे हा हल्ला झाला आहे. येथे तैनात असलेल्या 46 आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या तुकडीसोबत कमांडिंग ऑफिसरचे कुटुंबीय आणि शीघ्र कृती दलाचे काही सदस्यही उपस्थित होते.

या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरसह शीघ्र कृती दलाचे 4 जवान शहीद झाले आहेत. तसंच, कमांडिंग ऑफिसरचे दोन कुटुंबीयही मृत्युमुखी पडले आहेत.

या हल्ल्यामागे मणिपूर येथील पीपल्स लिबरेशन आर्मीचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. हा हल्ला भ्याड असून त्याचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.