मणिपूरमध्ये मैतेई महिलेवर सामूहिक बलात्कार; 3 मे रोजी घटना, 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपुरात तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात 160हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपूरच्या चुराचंदपूरमधील एका मैतेई महिलेने कुकी समाजाच्या लोकांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही 37 वर्षीय आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 3 मे रोजी कुकी समाजातील लोकांनी घराला आग लावली. दोन मुले, भाची आणि वहिनीसोबत जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त जमावाने मला पकडले, शिव्या दिल्या, मारहाण केली. मी याला विरोध केला तर मला जमिनीवर आपटले व माझ्यावर गँगरेप केला. माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर मी तेथून कसाबसा जीव वाचवून मदत पेंद्र गाठले. समाजाच्या भीतीने मी आतापर्यंत याची वाच्यता कुठेच केली नाही. परंतु आता असंख्य महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत आहेत. त्या पुढे येत आहेत. हे पाहिल्यानंतर माझ्यात हिंमत आल्याचे पीडित महिला म्हणाली. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळायला हवी, असे पीडित महिलेने म्हटले आहे.