
मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज कुकी समुदायाच्या 2 जणांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर 30 घरे पेटवून दिली. नागा समुदायातील 6 जणांचे मृतदेह बुधवारी आढळल्यानंतर आज घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड तणावाची स्थिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, कामजोंग जिल्ह्यातील कुलतूह कुकी गावात पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कुलतुह कुकी हे म्यानमार सीमेजवळ कुकी समुदायातील लोकांचे लहान गाव आहे. हत्या केल्यानंतर 30 घरे जाळली. त्यानंतर गावात संताप उफाळून आला. ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली. कुकी संघटनांनी हत्येचा तीव्र निषेध केला आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल गावात दाखल झाले.
बुधवारी नागा समुदायातील 6 जणांचे मृतदेह कांगपोकपी जिल्ह्यात आढळले होते. या लोकांचे 13 मे रोजी लीलोन वैफेई गावातून अपहरण करण्यात आले होते. त्यांचे मृतदेह आज इंफाळमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. 13 मे रोजी 14 जणांचे अपहरण झाले होते. त्यापैकी 8 जण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत.



























































