
गुजरातमध्ये आपचा प्रचार जोरात सुरू आहे. गुजरातमध्ये आपला जनतेचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे गुजरातमधील आपचा प्रचार रोखण्यासाठी उद्या मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात येईल, असा दावा आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मनीष सिसोदिया यांना समन्स पाठवून सीबीईयने उद्या बोलावले आहे. त्यावर भारद्वाज यांनी हा दावा केला आहे.
सिसोदियांना अटक करण्यामागे कोणतेही प्रकरण नसून याचा संबंध गुजरात निवडणुकीशी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एक्साइज प्रकरणात सीबीआय- ईडीने 500 पेक्षा जास्त ठिराणी छापे टाकले आहेत. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. भाजपच्या इशाऱ्यावर आपच्या नेत्यांना अटक करण्यात येईल, तितका आप गुजरातमध्ये मजबूत होईल आणि जनतेचा प्रतिसाद वाढेल, असेही ते म्हणाले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उद्या सीबीईयने बोलावले आहे. केंद्र सरकारची एजन्सी असलेली सीबीआय उद्या त्यांना अटक करेल. दिल्लीतील एक्साइजमध्ये 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी 500 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता या धाडींची माहिती प्रसारमाध्यमांनाही देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुजरातमधील जनतेला आता बदल हवा आहे. त्यामुळे निवडणुकीत आप आणि भाजप यांची थेट लढत आहे. त्यामुळे भाजप बिथरली आहे. त्यांची भीती त्यांच्या प्रत्येक कारवाईतून दिसून येत आहे, असेही भारद्वाज म्हणाले. गुजरातच्या प्रचारासाठी सिसोदिया यांचा महिन्याभराचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यांचा हा प्रचार रोखण्यासाठी त्यांना अटक करण्यात येणार असल्याचा दावा आपने केला आहे. आपच्या नेत्यांना अटक करून आमचा पक्ष कमजोर होणार नाही, तर गुजरातमध्ये आमची ताकद वाढेल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.



























































