मांजरा नदीला पुन्हा महापूर; नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली

लातूर आणि परिसरात गेल्या दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीपात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी पुन्हा पाण्याखाली गेल्या आहेत. मांजरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. मांजरा प्रकल्पामधून विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड परिसरातील नदी काठावरील गावांमधून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

मांजरा नदीपात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून नदीपात्राबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी पसरले आहे. जवळपास 700 ते 800 मीटर दूरवर नदीचे पाणी ऊस पिकाच्या वरून वाहत आहे. सततच्या येणाऱ्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नदीकाठी असणाऱ्या जमिनीचे नुकसान होत आहे. जमिनीला मोठे खडे पडत आहेत. आतापर्यंत आलेल्या पुराचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सततच्या महापुराने गावालगत असणाऱ्या शेतीत सडलेल्या पिकामुळे दुर्गंधी पसरत आहे. मांजरा नदीला पुन्हा महापूर आल्याने नदीकाठच्या गावांची परिस्थिती बिकट झाली आहे.