मनमाडकर मलेरियाच्या तापाने फणफणले

22

  सामना प्रतिनिधी। मनमाड

पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून मनमाड शहरात डेंग्यू तसेच चिकन गुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शहरातील स्वच्छता तसेच आरोग्यसेवा पुरवण्यात नगरपालिकेची दिरंगाई होत असल्यामुळे मलेरियाच्या साथीने मनमाडकर फणफणले आहेत. या रुग्णांमुळे  शासकीय उपजिल्हा रुग्णालय व शहरांतील सर्वच खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत.

गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या साथीच्या आजारांनी शहरात थैमान घातले आहे. मलेरिया व चिकन गुनिया हा नगरपालिकेच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चिकुन गुनियाचे 10 रुग्ण तर डेंग्यू व डेंग्यूसदृश्य आजाराचे सुमारे 8 रुग्ण शहरात आढळले असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याची नगरपालिका प्रशासनाने तातडीने व गांभीर्याने पावले उचलायला हवीत. चिकुन गुनिया, मलेरिया व डेंग्यू या रोगांच्या साथीमुळे शहरातील आरोग्यव्यवस्थेचा नाकर्तेपणा समोर आला आहे. स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी मनमाडसाठी नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचारी वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

डासांची संख्या वाढली
हे आजार स्वच्छ पाण्यातील डासांच्या आळ्यांमुळे होत असले तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱया कमी अधिक पावसामुळे पाण्याचे डबके साचून डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू आणि चिकुन गुनिया फैलावत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या