
गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र प्रथमच इंग्रजीत पुस्तक रुपात येत आहे. पत्रकार सदगुरु पाटील व मायाभुषण नागवेकर यांनी मिळून लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन पेंग्वीन प्रकाशन संस्थेकडून केले जाणार आहे. पेंग्वीनने त्याविषयीची घोषणा सोमवारी केली.
पर्रीकर यांचा मंगळवारी पहिला स्मृतीदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर पेंग्विन रेण्डम हाऊसतर्फे पर्रीकरांवरील पुस्तक एप्रिलमध्ये वाचकांसाठी उपलब्ध होत असल्याचे पेंग्वीनच्या प्रकाशक मिली ऐश्वर्या यांनी जाहीर केले. यापूर्वी सदगुरु पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पर्रीकरांवरील पहिले पुस्तक लिहिले होते. यावेळी पाटील व नागवेकर यांनी मिळून पूर्ण नव्या पुस्तकाची निर्मिती पेंग्वीनसाठी केली आहे. ‘ऍन एक्सट्राऑर्डीनरी लाईफ ः अ बायोग्राफी ऑफ पर्रीकर’ असे पुस्तकाचे नाव आहे. पर्रीकर यांचे बालपणीचे मित्र, कुटुंबिय, नातेवाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, काही टीकाकार यांच्याशी बोलून या पुस्तकात बरीच सचित्र रंजक माहिती समाविष्ट केली गेली आहे.



























































