खंडणी प्रकरणातील फरार मनोज अडसुळला घाटकोपरमध्ये अटक

454

डॉक्टरला अ‍ॅट्रोसिटी गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवून तब्बल 75 लाख रुपयांची खंडणी उकळणारा आणि काही दिवसांपासून फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. तो एका मित्राच्या वडिलांच्या घाटकोपरमधील पंतनगर राहत होता. गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेने तेथे छापा घालून अडसुळला ताब्यात घेतले. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रासने यांच्या दवाखान्यात 18 ऑक्टोबर 2019 मध्ये एक महिला उपचारासाठी आली होती. तपासणी फि वरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर संबंधीत महिनेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य न आढळल्यामुळे पोलिसांनी संबंधित चौकशी बंद केली. मात्र मनोज अडसुळ याने बनाव रचत ती महिला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत आहे. तुमच्या मुलाला अटक होईल. त्याच्या पासपोर्टवर शिक्का पडले. त्याला परदेशात जाता येणार नाही, असे सांगून डॉ. रासने यांना घाबरुन सोडले होते. प्रकरण मिटवण्यासाठी अडसूळने त्यांच्याकडून 75 लाख रुपयांची खंडणी वसुल केली. उरलेले 55 लाख रुपये देण्यासाठी मनोजने डॉ. रासने यांच्याकडे तगादा लावला होता. तेव्हा डॉ. रासने यांनी पोलीस मित्र असलेल्या जयेश कासट याला ही माहिती सांगितली. त्यानंतर कासटने जयेशला डॉक्टरांचे पैसे परत दे, नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला आत टाकतो अशा धमक्या देऊन त्याच्याकडून 5 लाख रुपये लाटले. कासटच्या सततच्या त्रासामुळे मनोज अडसुळने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कासट खंडणी मागत असल्याची तक्रार केली. त्याच्या अर्जाची चौकशी करता अडसूळ यानेच डॉ. रासने यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अडसूळ फरार होता. याप्रकरणी मनोज अडसुळच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलीस मित्र जयेश कासटला अटक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या