मराठा आरक्षण मंजूर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहिल, मनोज जरांगे पाटील यांची गर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण लागू करणे हे न्यायोचित आहे. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मंजूर होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी गर्जना आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केली. जळकोट व मुखेड तालुक्यातील समाज बांधवांसाठी जांब  येथे आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात तुमचा पाठिंबा असाच राहू द्या, कुणबी मराठा असा उल्लेख असलेले 35 लाख महसुली पुरावे राज्यात आढळून आले आहेत. आणखीही नोंदी मिळू शकतात. त्यामुळे मराठ्यांचा ओबीसीत समावेश करुन कायदा पारित करावा. मराठ्यांना उद्रेक करण्याच्या वळणावर आणू नका. ता. 24 डिंसेबर पर्यत वाट पाहू. आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. ही गर्जना सहज घेऊ नका अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जळकोट -जांब परिसरात 9 डिंसेबर रोजी मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा ताफा 2 वाजता सभास्थस्थळी पोहचला. नंतर त्यांनी विराट सभेला संबोधित केले.पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा ही जात जगाच्या पाठीवर शांत आहे. मात्र एखाद्याच्या पाठीमागे लागली तर शांत बसणार नाही. मराठा आरक्षणासाठी ज्या योद्धयांचे बळी गेले त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान राज्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सर्व गुन्हे राज्याचे गृहमंत्री मागे घेणार आहेत.

मराठा समाजाने एकजुटीने आरक्षण लढ्याला साथ द्यावी. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. म्हणून कोणी आडवे आले तर तुडवून पुढे जाणार आहोत.ज्या राजकीय मराठ्यांना मोठे केले तेच आमच्या बाजूने नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जरागे पाटील म्हणाले की, आरक्षण लढा कदापि अर्धवट सोडणार नाही. ता. 24 डिंसेबर ही सरकारला दिलेली अंतीम तारीख आहे. त्यानंतर मुंबई गाठून सरकारला मराठ्यांचा हिसका दाखवायचा आहे. पण तशी वेळ येऊ नये. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोणाचाही विरोध नाही. ज्यांनी महाराष्ट्र सदनच नाही तर अनेक योजनाही खाल्ल्या त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे.