आता बोलाल तर धुऊन काढेन; जरांगे पाटील यांचा राणे यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांचे डोके फिरले आहे, अशी टीका केली होती. त्याचा जरांगे यांनी चांगला समाचार घेतला. राणे यांना शेवटची संधी आहे. आता ते काही बोलले, तर मात्र सोडणार नाही. धुऊन काढेन असा इशारा नारायण राणे यांना दिला. तसेच त्यांनी चार दिवस उपोषण करून बघावे, असा टोलाही जरांगे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ओबीसी असल्याचा अभिमान आहे. आपल्या भाषणातही ते अनेकदा बोलून दाखवतात, असेही ते म्हणाले.

मराठवाडय़ात चक्काजाम
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शुक्रवारी मराठवाडय़ात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला. हिंगोली, धाराशीव, बीड जिल्हय़ांत वाहनांवर दगडफेक करण्यात आली तसेच बसेस पेटवून देण्यात आल्या.

कुणबीकरण थांबवावे – छगन भुजबळ
खोटय़ा नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले जात आहेत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सरकारने कुणबीकरण थांबवून सर्व मराठय़ांचा स्वतंत्र आरक्षणात समावेश करावा, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये शुक्रवारी छगन भुजबळ हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.