मराठा समाजाला आरक्षण द्या, नसता प्रचंड उद्रेक होईल! मनोज जरांगे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला महिनाभराची मुदत दिली आहे. या मुदतीत सरसकट कुणबी प्रमाणपत्रे सरकारला द्यावीच लागतील नसता प्रचंड उद्रेक होईल, असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही, असेही त्यांनी सरकारला बजावले.

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा आणि परभणी येथे आज मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा झाल्या. कुरुंदा येथील सभेनंतर वसमतपर्यंत दुचाकी रॅलीही काढण्यात आली. या दोन्ही सभांना लाखोंची गर्दी उसळली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी आपण १७ दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी महिनाभरात आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचा शब्द दिला. महिनाभराच्या वर आणखी दहा दिवस मी त्यांना दिले. ४० दिवस घ्या, पण आम्हाला आरक्षणच पाहिजे त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे मी उपोषण सोडतानाच सरकारला स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे सरकारने आता कोणतीही कारणबाजी न करता आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षा जास्त उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

कायदा, सुव्यवस्था पाळून मराठा समाजाने आपली लढाई लढावी आणि यश पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले. निर्णायक वळणावर आलेले हे आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतिम निर्णय आंतरवालीत घेणार
मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर आणखी 10 दिवस वाढवून दिले आहेत. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारच्या निर्णयाची आपण वाट पाहू. 24 ऑक्टोबर रोजी आंतरवालीत संपूर्ण राज्यातून मराठा बांधव येणार आहेत. त्यांच्या साक्षीने पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.