देवेंद्र फडणवीस मोदींचा करेक्ट कार्यक्रम करणार, मनोज जरांगे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाबद्दलच्या द्वेषापोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत सुटले आहेत. त्यांची ही चुकीची कृतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम करेल, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आज दिला.

बीडच्या गेवराई तालुक्यात रविवारी ‘मोफत नोकरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मनोज जरांगे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी मराठा समाज आणि सत्ता याच्यातील काटा आहे. हा काटा काढावाच लागणार असा पण त्यांनी केला आहे, असा आरोप करतानाच आपणही मराठा समाजासाठी तुरुंगात सडायला तयार आहोत, असे आव्हान जरांगे यांनी दिले.

बुडतीचे पाय डोहाकडे

देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ग्रामीण भागातील ‘बुडतीचे पाय डोहाकडे’ या म्हणीप्रमाणे आहे. ते मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करत सुटले आहेत, यावरून त्यांच्या पोटात मराठय़ांविषयी किती राग आहे तो दिसून येतो, असे जरांगे म्हणाले. एसआयटीच्या पथकाकडून आपल्या डॉक्टरांची चौकशी केली जात आहे तसेच आपल्यावर जेसीबीतून फुले उधळणाऱयांवर गुन्हे दाखल करण्यात आले, असे जरांगे यांनी सांगितले.

असे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही

राज्य सरकार माझ्यावर इतपं का जळतं? असा सवाल करतानाच असे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही, असा टोलाही जरांगे यांनी लगावला. फडणवीसांना त्यांचा पण पूर्ण करायचा आहे, तसाच आम्हीदेखील आमचा पण पूर्ण करू, असा स्पष्ट इशाराही जरांगे यांनी दिला.