
सामना प्रतिनिधी । पुणे
शहरात चोरट्यांनी प्रचंड उच्छा मांडला आहे. एका दिवसात शहरात सहा घरफोडी झाल्या आहेत. विमाननगर येथे तर मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी १९ लाख ५५ हजार ४७७ रुपयांचे ९३ मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली.
भावेश रमणलाल सोळंकी (वय ३८, रा. शिवाजीनगर) यांनी या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमाननगर येथे नगर रस्त्यावर दत्तमंदिर चौकात ‘केन्शा मोबाईल शॉपी’ नावाचे दुकान आहे. हे दुकान रोज सकाळी साडेऊन ते रात्री दहादरम्यान उघडे असते. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हे दुकान बंद झाले. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे ९३ मोबाईल आणि ३९ हजार रुपये रोख, आठ डेमो पीस असा १९ लाख ५५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मोबाईल शॉपी उघडताना चोरी झाल्याचे सोळंकी यांच्या लक्षात आले. याची माहिती मिळाल्यावर विमानतळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लंपास केला.
धायरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास
धायरी येथे लायगुडेवस्तीतील आकाश बळी ढावरे (वय २४) यांचा फ्लॅट फोडून दोन लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दूध डेअरीतून ६० हजारांची चोरी
बुधवार पेठेतील ‘कल्पना डेअरी’चे शटर उचकटून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. लखन महादेव कोल्हे (रा. अश्रफनगर, कोंढवा) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भवानी पेठेत फ्लॅट फोडले
भवानी पेठेतील दोन फ्लॅट फोडून १६ हजार ६२० रुपयांचा ऐवज लंपास केला. विनायक गजानन जाधव (वय ३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी या संदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांच्या घरातून आठ हजार, तर त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरातून आठ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
शेळकेवस्तीत चोरी
बिबवेवाडीतील शेळकेवस्ती येथे किशोर अरुण कदम (वय ३१) यांच्या भावाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डेक्कन येथे ६८ हजारांची चोरी
डेक्कन जिमखाना येथील परिमल सोसायटीतील फ्लॅट फोडून चोरट्यांनी ६८ हजारांचा ऐवज लंपास केला. नितीन नारायण भालेराव (वय ५५) यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी चांदीचा तांब्या, सोन्याची कर्णपुâले आणि रोख रक्कम असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.































































