
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागांत केलेल्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मराठा आंदोलकांची आझाद मैदानात भेट घेतली होती. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान दिली होती. याशिवाय महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे लातूर विभागीय अध्यक्ष व्यंकटराव बिरादार यांनी मंत्री रावते यांना निवेदन देऊन मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्यात यावी,अशी मागणी केली होती. या अनुषंगाने मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे रावते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजबांधवांनी शांततेत आंदोलने केली होती. पण काही दुर्दैवी घटनांमध्ये काही आंदोलकांना जीव गमवावा लागला. यामध्ये बहुतांशी तरुण आणि कमावत्या आंदोलकांचा समावेश होता. आता या आंदोलकांच्या कुटुंबीयांना पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी एसटी महामंडळ त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.
– दिवाकर रावते,परिवहनमंत्री


























































