
आमच्या अन्नात माती कालवू नका. आरक्षणासंदर्भात दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास दिलेल्या आश्वासनांची क्लिप व्हायरल करू, असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला आहे.
मिंधे सरकारचे शिष्टाईमंत्री गिरीश महाजन यांनी कालच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, अशी भूमिका मांडली होती. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. तेव्हा मी आंतरवालीत गेलो होतो. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, हे मी व्यासपीठावरून स्पष्ट सांगितले होते. मात्र, ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आढळल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, पण त्यातही कायदेशीर पेच आहेत, असे महाजन म्हणाले होते.
मनोज जरांगे पाटील यांची आज सोमवारी जामनेर येथे सभा होती. या सभेत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये अन्यथा तुम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची क्लिप व्हायरल करू, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला.
आश्वासनांचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिष्टाई करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आले होते. त्यांनी मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आम्ही त्यांना वेळ दिला. त्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना विचार करून बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या
मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. या आंदोलनासंदर्भातील पुढील दिशा ठरविण्यासाठी 17 डिसेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावली असून, त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार असल्याची माहितीही यावेळी जरांगे यांनी दिली. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढविण्यात यावा तसेच मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.






























































