ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत अभ्यास व्हायला हवा!

मराठा समाज हा सामाजिकदृष्टय़ा मागास आहे हे सिद्ध झाले आहे. प्रवर्ग तयार झाला आहे. असे असताना ईडब्ल्यूएस घेणं हे लाभदायक आहे किंबहुना नुकसानसुद्धा होऊ शकतंय का? याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाने मराठा समाजाला लाभ होईल की नुकसान होईल याचा अभ्यास व्हायला हवा, असे मत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी येथे व्यक्त केले.

खासदार संभाजी राजे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले, ईडब्ल्यूएस घेतले तर एसईबीसीला सर्वोच्च न्यायालयात धोका होणार नाही याची सरकारने हमी द्यावी. ईडब्ल्यूएस फक्त मराठा समाजासाठी नसून सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. मध्यंतरी एका विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात ईडब्ल्यूएस मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, ईडब्ल्यूएस घेतलं तर एसईबीसीचं हक्काचं आरक्षण तिला मिळणार नाही. त्यानंतर एकदा अशोकराव चव्हाण, दिलीप वळसे-पाटील आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे सर्व आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. ज्यांना कोणाला ईडब्ल्यूएस घ्यायचे आहे त्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून घ्यावे, सरकारने त्याचे धोरण ठरवू नये, असे तज्ञांकडून यावेळी सांगण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या 25 जानेवारीला सुनावणी असतानाही ईडब्ल्यूएस जाहीर करण्याबाबत गडबड कशाला, असा माझा सरकारला प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करून मार्ग निघणार नाही. त्यांच्या अनुभवाचा समाजाच्या आरक्षणासाठी उपयोगच होईल, असेही खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वाट पाहतोय

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पूर्वीपासून सकल मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारले असता, मी स्वतः अनेकदा पंतप्रधानांना पत्रव्यवहार केले आहेत; परंतु यापूर्वी कोरोनामुळे भेटीची वेळ मिळाली नसावी. त्यांच्या भेटीसाठी वेळेची आपण आजही वाट पाहत आहोत, पण अद्याप वेळ मिळाली नसल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या