गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर अंबुलग्यात, संतप्त मराठा आंदोलकांनी गाडी फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावबंदी असतानाही भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे रात्रीच्या अंधारात गावात शिरल्याचे पाहून संतापलेल्या मराठा आंदोलकांनी घोषणा देत त्यांची गाडी फोडली. मराठा आंदोलकांचा रुद्रावतार पाहून खासदार चिखलीकरांना पोलिसांच्या गाडीत बसून गावाबाहेर सोडावे लागले.

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी नगरसेवक कृष्णा पापिनवार आणि इतर कार्यकर्त्यांचा ताफा गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास अंबुलगा येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर पाटील तेलंग यांच्या घरी पोहोचला. गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना गाव सोडून जाण्याची विनंती केली. मात्र मनोहर तेलंग यांनी मराठा आंदोलकांना अपशब्द वापरल्याने वातावरण चिघळले. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली.

मराठा आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा अंबुलग्यात दाखल झाला. आंदोलकांचा संताप पाहता पोलिसांनी खासदार चिखलीकरांना गाव सोडण्याचे सांगितले. खबरदारी म्हणून पोलिसांनी खासदार चिखलीकरांना आपल्या गाडीत बसवून घेतले आणि गावाबाहेर सोडले. त्यानंतर आंदोलक आणि मनोहर तेलंग यांच्यात हमरीतुमरी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.