परीक्षण – ‘मराठी’च्या अस्तित्वाची परखड चिकित्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल जोशी
[email protected]

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन सात दशके उलटली आहेत. त्यासाठी मराठी माणसाला 106 हुतात्मे द्यावे लागले. रक्तरंजित संघर्ष करावा लागला. दुसऱ्या एखाद्या राज्यात अशा स्थितीत तेथील राजभाषेला सुगीचे दिवस आले असते. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर निर्माण झालेल्या बहुतांश राज्यांमध्ये ती स्थिती आहेदेखील. अपवाद फक्त महाराष्ट्राचा. महाराष्ट्र निर्मितीचा भूतकाळ जसजसा पुढे सरकत आहे तसतसे ‘मायमराठीचे काय होणार?’ या प्रश्नाचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ धूसर होताना दिसत आहे. ‘मराठी भाषेचे वर्तमान स्वरूप’ या ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या पुस्तकात मराठी भाषेचे भूत, वर्तमान आणि भविष्य यांची सांगोपांग कारणमीमांसा दिसते.

डॉ. सुधीर रसाळ हे महाराष्ट्राच्या चिंतनशील समीक्षकांच्या यादीतील आघाडीचे नाव. त्यांचे मराठी भाषेविषयीचे चिंतन हे केवळ समीक्षेच्या परिघापुरता मर्यादित नाही. मराठी भाषा, महाराष्ट्रातील आजवरच्या राज्यकर्त्यांचे मराठी भाषाविषयक, शिक्षणविषयक धोरण, त्यातील मूलभूत चुका, त्यातून वाढत गेलेले इंग्रजी माध्यमाचे सार्वत्रिकीकरण, मराठी माणसाच्या मानसिकतेत झालेले स्थित्यंतर अशा अनेक अंगांनी डॉ. रसाळ हे समीक्षक आणि अभ्यासक या नात्याने वेळोवेळी व्यक्त झाले आहेत. त्यांच्या 1960 ते 2022 या सहा दशकांतील अशाच लेखांचे आणि भाषणांचे संपादित रूप म्हणजेच ‘मराठी भाषेचे वर्तमान स्वरूप’ हे पुस्तक आहे. ‘मराठीचे काय होणार?’ या आजही पडणाऱया प्रश्नाभोवती हे पुस्तक फिरते. त्याची सखोल आणि परखड कारणमीमांसा करते. वास्तव कटू असले तरी निर्भीडपणे व्यक्त करते आणि हे वास्तव दूर करण्याविषयीच्या उपाययोजनांचीही मांडणी करते. एकूण सात लेखांचे संपादन या पुस्तकात आहे. स्वातंत्र्यानंतर भारतभरातच सुटलेला इंग्रजीचा अश्वमेध आजही का थांबवता आलेला नाही, याचे मूळ या पुस्तकातील विवेचनात सापडते. इतर राज्यांमध्येही इंग्रजीचा वरचष्मा असला तरी तेथील राज्यकर्ते आणि जनता दोघांनीही आपापल्या भाषेचा मान, सन्मान, स्वाभिमान आणि अस्तित्व जाणीवपूर्वक जपले आहे. महाराष्ट्रात मात्र राज्यकर्ते आणि मराठी माणूस या दोन्ही पातळ्यांवर नेमकी त्या उलट स्थिती आहे. ही स्थिती का आली याची परखड कारणमीमांसा वास्तव डॉ. रसाळ करतात. 2025-26 मध्येही मराठीचा मानसन्मान त्रिभाषा सूत्राच्या वादातच अडकलेला पाहिल्यावर काही दशकांपूर्वी डॉ. रसाळ यांनी धरलेल्या भाषिक आग्रहाची उपयुक्तता पटते. ज्ञान प्रक्रियेची मूलभूत भाषा (मराठी), शिक्षणाची भाषा (इंग्रजी) आणि जीवन व्यवहाराची भाषा (इंग्रजी/हिंदी) या त्र्यांगडय़ातच मराठीचे अस्तित्व आजही फसलेले आहे. डॉ. रसाळ यांनी काही वर्षांपूर्वी या त्र्यांगडय़ाची कल्पना देऊनही परिस्थिती बदलली नाही, हे आपले दुर्दैव!

मराठी भाषेप्रमाणेच वाङ्मयासंबंधीचे डॉ. सुधीर रसाळ यांचे चिंतन वास्तवदर्शी आहे. सध्याच्या मानवी जीवनव्यवहारात पुस्तके, वाङ्मय यांचे स्थान काय आहे? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्याचेही परखड उत्तर डॉ. रसाळ देतात. इतर व्यावसायिकांच्या तुलनेत कवी-लेखकांना कमी प्रतिष्ठा मिळते हे सत्य ते खुलेपणाने मांडतात. राज्यातील वाङ्मय अभ्यासाचे एकूण स्वरूप, त्याचे उद्दिष्ट, त्याची सद्यस्थिती, त्याच्या वाटय़ाला आलेले न्यूनपण, समज-गैरसमज, वाङ्मय प्रकारांचा अभ्यास, त्यांची उद्दिष्टे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक अभ्यासक्रमाचा आराखडा, त्यांचे अध्यापन आणि अध्यापकांची त्यातील भूमिका असे चौफेर चिंतन डॉ. रसाळ यांनी केले आहे.

मराठीवरील परभाषिक आक्रमणे हा विषय पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन भागांत आला आहे. या विषयाला हात घालताना डॉ. रसाळ थेट मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, त्या वेळची महाराष्ट्राबद्दलची केंद्रीय राज्यकर्त्यांची मनोभूमिका, भाषावार प्रांतरचनेला केंद्रातील सत्ताधाऱयांमध्येच असलेला अंतर्विरोध, मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषा, संस्कृतीबाबतचा केंद्रीय सत्तेचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या सगळ्या मुद्दय़ांचा सडेतोड परामर्श घेतात. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची स्थापनेपासूनची ‘सर्वप्रांतीय’ मनोभूमिकाच आज निर्माण झालेल्या मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला कारणीभूत आहे, असे ठाम मत ते मांडतात. मराठीवरील भाषिक आणि इतर आक्रमण तसेच मराठीमधील हिंदी-इंग्रजीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घुसखोरीचा सोदाहरण घेतलेला आढावा वाचकांच्या मनाला नक्की भिडेल.

मुळात मराठी भाषा आणि वाचनप्रियता यांविषयी चिंताजनक स्थिती आहे. तरीही आपल्या प्रकाशनाचा प्रारंभ मराठीवरील या टीकात्मक आणि समीक्षात्मक पुस्तकाने करण्याचे धाडस प्रकाशकांनी कसे दाखवले, हा प्रश्न पडतो, परंतु त्याचे उत्तर त्यांनीच त्यांची भूमिका मांडताना दिले आहे. व्यवसाय आणि सामाजिक जाणीव यामध्ये दुसऱया गोष्टीला प्राधान्य देण्याचा तसेच मराठी टीकात्मक ग्रंथांच्या वाचनाबाबत असलेल्या परंपरागत समजुतीला धक्का देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तो प्रयत्न कौतुकास्पद आहे. आणखी एक गोष्ट जाणवली ती पुस्तकातील लेख 1966 ते 2022 या प्रदीर्घ कालावधीतील आहेत. त्यामुळे प्रत्येक लेखाचा प्रकाशन काळ तेथे दिला असता तर लेखाची काळानुरूप संगती लागणे वाचकाला सोपे गेले असते. शिवाय मुखपृष्ठकारांचे मुखपृष्ठाविषयीचे मनोगत तसेच इतर ‘बायलाइन्स’ शेवटी का दिल्या आहेत, याचेही नीट आकलन होत नाही. अर्थात, तो भाग प्रकाशकांची ‘लिबर्टी’ म्हणून सोडून देता येईल. बाकी हे पुस्तक म्हणजे मराठीच्या भूत, वर्तमान आणि भविष्याची परखड चिकित्सा आहे, प्रकाशकांचा मराठीसाठीचा ‘जागर’ आहे असे निश्चित म्हणता येईल.

मराठी भाषेचे वर्तमान स्वरूप
– लेखक : डॉ. सुधीर रसाळ
– प्रकाशक : लेदरबॅक पब्लिशर्स
– पृष्ठे : 107, मूल्य : 199 रुपये