
दुकानांवर मराठी पाटय़ा लावण्याची मुदत 30 सप्टेंबरला संपल्यानंतर अजूनही सुमारे पाच लाख दुकानदारांपैकी दोन लाख दुकानदारांनी आपल्या दुकानांवर मराठी पाटय़ा लावलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेनेही आता कारवाईसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. यामध्ये पुढील सोमवारपासून आठवडाभर संपूर्ण मुंबईत दुकानदारांनी केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर कारवाई सुरू करण्याची तयारी पालिकेने केली आहे. यामध्ये दुकानातील एका कामगारामागे एक हजाराचा दंड केला जाऊ शकतो.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022 ला दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेतला. यानुसार पहिल्यांदा 31 मे 2022 पर्यंतची मुदत दुकानदारांना देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांनी ‘कोरोनाचा फटका’ आणि व्यवसायातील मंदीचे कारण देत तीन वेळा मुदत वाढवून घेतली. 30 सप्टेंबरची मुदत संपूनही दोन ते सव्वादोन लाख दुकानदारांनी अद्याप दुकानांवर मराठी पाटय़ा लावलेल्या नाहीत. पालिकेच्या या कारवाईविरोधात व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत अद्याप कोणतेही आदेश दिले नसल्याने पालिका कारवाईवर ठाम असल्याचे समजते.
असा होणार दंड
z 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
z दरम्यान, मद्यविव्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबत नियमाकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास दुकानातील प्रत्येक कामगारामागे एक हजार किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड वसूल करण्यात येणार आहे.
असा आहे नियम
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.
























































