
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा फटका सगळ्यांनाच बसला आहे. राज्यासह देशभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धच्या लढय़ात आता मराठी कलाकारदेखील मैदानात उतरले आहेत. प्लाझ्मा दान असो किंवा गरजूंच्या मदतीसाठी आवाहन यासाठी सेलिब्रेटी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसतायत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहनही कलाकारांनी केले आहे.
स्वप्नील जोशीचे कौतुकास्पद पाऊल
अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकताच एक काwतुकास्पद निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस मी सोशल मीडियाचा वापर कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठीच करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत स्वप्नील म्हणाला, पुढचे काही दिवस सोशल मीडियावर मी माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. या माध्यमाचा वापर फक्त कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी करणार आहे. माझ्या अकाऊंटवर फक्त कोरोनासंबंधित पोस्ट असतील. कोरोनाची माहिती असेल, एखाद्याच्या मदतीसाठी आवाहन असेल. स्वप्नीलच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुबोध भावेंची कळकळीची विनंती
अभिनेते सुबोध भावे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्वस्थ राहा, मस्त राहा पण घरात राहा असे आवाहन चाहत्यांना केले आहे. सुबोध म्हणाले, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतेय. शासन, प्रशासन, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस, डॉक्टर असे सगळेच जण अथक प्रयत्न करतायत. तरीसुद्धा कोरोना आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, अनावश्यक किंवा छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी घराबाहेर पडू नका. भाजी, औषधे अशा वस्तू आणायच्या असतील तर आठवडय़ाचे प्लॅनिंग करूनच बाहेर पडा. जेणेकरून संसर्ग तुमच्यापर्यंत आणि तुमच्या माध्यमातून पुटुंबीय, मित्रमंडळींपर्यंत पोहोचणार नाही.
प्लाझ्मा दानासाठी सोनालीची हाक
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली पुलकर्णी हिने प्लाझ्मा दानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. ‘‘सध्या रक्तदानाची जितकी गरज आहे तितकीच प्लाझ्मा दानाचीदेखील आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे आणि बाळंतीण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येत नाही म्हणून इतर महिलांनी अवश्य पुढे यावे,’’ असे आवाहन सोनालीने केले आहे.
दामले म्हणतायत, ‘मस्त खा अन् स्वस्थ राहा’
राज्यात सध्या आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास नागरिकांना मनाई आहे. या पार्श्वभूमीवर मस्त खा, स्वस्थ राहा आणि स्वतःला आपल्या आवडत्या छंदात गुंतवून घ्या. नवीन काय करता येईल किंवा आता आपण जे करतोय ते अजून छान कसे करता येईल याचा विचार करा, असे आवाहन अभिनेते प्रशांत दामले यांनी केले आहे. आम्हा कलाकारांचा तुम्ही ऑक्सिजन आहात असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱया कर्मचाऱयांचे आभार मानले आहेत.




























































