
सामना ऑनलाईन । मुंबई
गिरगाव येथील रॉयल ऑपेरा हाऊस या वास्तूने मराठी रंगभूमीची वैभवशाली परंपरा जोपासून हाऊसफुलचे बोर्ड झळकावल. हाच सुवर्णकाळ तब्बल 30 वर्षांनी शनिवारी पुन्हा एकदा या वास्तूने अनुभवला. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग ऑपेरा हाऊसमध्ये रंगला. मराठी नाटकांसाठीच्या या रेड कार्पेटने प्रेक्षक सुखावले.
2016 साली रॉयल ऑपेरा हाऊसचे नूतनीकरण करून ते सुरू करण्यात आले. तेव्हापासून मराठी नाटकांचे प्रयोग तिथे झालेले नाहीत. ‘अ परफेक्ट मर्डर’चा पहिला प्रयोग प्रचंड गर्दीत काल पार पडला. आफ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर ‘अ परफेक्ट मर्डर’नाटक आधारित आहे. नीलेश शिरवाईकर लिखित नाटकाची निर्मिती निनाद करपे यांची तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. नाटकात सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री, श्वेता पेंडसे, अभिजित केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बुक माय शो आणि बदाम राजा प्रोडक्शन ‘अ परफेक्ट मर्डर’चे सहनिर्माते आहे. रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये मराठी नाटकाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. विजया मेहता, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, आर. बाल्की, गौरी शिंदे यासारख्या सेलिब्रेटींनी रेड कार्पेट वॉक केला. यावेळी बुक माय शोचे सीओओ अल्बर्ट अल्मेडिया, बदाम राजा प्रोडक्शचे निनाद करपे आणि विनायक गवंडे, मंगला केंकरे आदी उपस्थित होते. ‘अ परफेक्ट मर्डर’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पुष्कर श्रोत्री यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.
बुक माय शो मराठी नाटकांच्या सहनिर्मितीत
2016पासून बुक माय शो मराठी नाटकांसाठी तिकीट बुकिंगची सेवा देत आहे. या सेवेला मराठी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आम्ही तर अ परफेक्ट मर्डरच्या सहनिर्मितीचे रेड कार्पेट घातले आहे. यापुढेही मराठी नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सहभागी होऊ, असे आश्वासन बुक माय शोचे सीओओ अल्बर्ट अल्मेडिया यांनी दिले.
























































