‘संगीत मानापमान’ रुपेरी पडद्यावर, सुबोध भावे करणार दिग्दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कटय़ार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर आधारित चित्रपट अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर सुबोध भावे आता ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर ‘मानापमान’ चित्रपटाद्वारे सादर करणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

सुनील फडतरे निर्मित या चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. कृष्णाजी खाडिलकर यांनी ‘संगीत मानापमान’ नाटक लिहिलं होतं, तर शिरीष देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहीत आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं, तर चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत. ‘नमन नटवरा’सारखी नांदी या नाटकानं दिली होती, तर ‘नाही मी बोलत नाथा’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘शूरा मी वंदिले’, ‘युवतीमना दारुण रण’ अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 1911 मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रूपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील तसेच ‘संगीत मानापमान’ नाटकातील कोणती पदं चित्रपटात असतील याची उत्तरं टप्प्याटप्प्याने मिळतील.