रसिकहो- एक इब्लिस थरार

7619

>> क्षितिज झारापकर

‘इब्लिस’ वैभव मांगले हे नाव ज्या नाटकाशी जोडले जाते त्या नाटकाशी वैविध्यपूर्ण इब्लिसपणा आपसुकच जोडला जातो.

नाटक म्हणजे काय? हा प्रश्न प्रत्येक रंगकर्मीला पडतो. कालांतराने या क्षेत्रात कार्यरत असताना रंगकर्मी या प्रश्नाचं आपापल्या परीने उत्तर शोधतात आणि त्याप्रमाणे आपापला कलाप्रवास घडवतात. काही मूलतः विचार करण्यासारखे मुद्दे मात्र आहेत. नाटक ही प्रेक्षकाभिमुख कला आहे. त्यामुळे समोर प्रेक्षक नसला तर नाटक संभवत नाही. गायन कला किंवा चित्रकला ही स्वानंदासाठी असू शकते. कारण या कला एकल कला आहेत. एकटय़ाने त्या साधल्या जाऊ शकतात. पण नाटककाराचं नाटक आणि दिग्दर्शकाचं त्या नाटकाचं सादरीकरण हे अभिनेते आणि तंत्रज्ञांशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच यातील कोणताही घटक नाटक स्वानंदासाठी करू शकत नाही. हे सगळं का? कारण अशी काही नाटकं हल्ली रंगभूमीवर आली आहेत जी सर्वसाधारण नाटकांपेक्षा वेगळी आहेत.

नाटकाला एक कथानक हवं. कारण बघणारा सर्वसाधारण प्रेक्षक हा गोष्टीवेल्हाळ असतो हा भरतमुनींपासून आजवर झालेल्या एम्पीरिकल एव्हीडन्समधून निघालेला निष्कर्ष आहे. त्या कथानकाला पुढे सरकवणाऱया घटना नाटकात हव्या, कारण त्यामुळे नाटकाला एक गती आणि लय प्राप्त होत जाते. त्या घटनांमध्ये रिऍक्ट होणारी पात्ररचना हवी म्हणजे मग प्रेक्षक त्या घटनांमध्ये गुंतत जातो. ही पात्र सक्षमपणे उभी करणारे कलाकार हवे तर ते नाटक समोरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतं. या सगळ्याला नेपथ्य, प्रॉपर्टी, संगीत आणि प्रकाशयोजनेचा सपोर्ट हवा. यातला काही प्रकार खरा नसून काल्पनिक असला तरी चालतो, पण तो निदान सुचक तरी हवा, कारण जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांची कल्पनाशक्ती गृहित धरणं प्रेक्षकाभिमुख क्षेत्रात चुकीचं आहे. हे झालं सर्वसामान्य नाटकांचं गमक. हल्ली बरेच रंगकर्मी या गमकात बसणाऱया नाटकांना उथळ, गल्लाभरू आणि गिमिक्सचा वापर करून प्रेक्षकांना फसवणारी नाटकं म्हणून हिणवू लागले आहेत. मुळात सर्वसामान्य प्रेक्षकांच्या नाटकाच्या अनुभूतीला वृद्धिंगत करणारा प्रयत्न हिणवण्यात काय अर्थ आहे हा वेगळा प्रश्न आहे. हे रंगकर्मी वरील गमकातील एक किंवा अनेक बाबी वगळून किंवा बदलून सादरीकरणाचे जे प्रयत्न करतात त्यात हिच अनुभूती वृद्धिंगत करण्याचा प्रयास नाही का? मुद्दा आम्ही करत असलेल्या वृद्धीबरोबर आणि इतरांच्या हीन आणि सबस्टॅन्डर्ड मानसिकतेचा आहे. याला व्यावसायिक, मानसिक, पोस्ट मॉर्डनिझम वगैरे लेबल लावली की कटिंग चहा आणि कॉफी वजा चर्चा सोप्या होतात.

व्यावसायिक नाटक हे जमणाऱया प्रेक्षकसंख्येचा लसावी पकडून चालणारं असतं आणि म्हणून ते अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं. असंच एक नाटक सध्या राहुल भंडारे यांच्या अव्दैत थिएटर्सने ‘झी’ मराठीच्या मदतीने आणलंय. ‘इब्लिस’ हे ते नाटक. मिलिंद शिंत्रे हे फेसबुकीय उपहासकार ‘इब्लीस’चे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. नाटकाच्या लिखाणात हा त्यांचा गुण सतत दिसत राहतो. मुळात कथानक हे नावाला साजेसं आणि नाटकाच्या स्थळाशी सुसंगत असं आहे. कोकण किनाऱयावरील एका आडगावी एका वाडय़ाची मालकसदृष्य व्यक्ती, त्याची एक अंगवस्त्र्ावजा बाई, हाताखालचा एक नोकर आणि वाडा विकत घ्यायला आलेला एक परप्रांतीय पाहुणा यांच्यात घडणारं थरारनाटय़ म्हणजे ‘इब्लिस’. म्हणजेच कथानक, घटना, पात्ररचना आणि तांत्रिक बाबी गमकात बसणाऱया आहेत. ‘इब्लिस’ची गती खूप कटाक्षाने पाळत दिग्दर्शक शिंत्रे लेखक मिलिंदचं नाटक सतत हलतं ठेवतात. लिखाणातून प्रत्येक पात्राची, वाडय़ाची आणि घटनाक्रमाची गुढता वाढवत नेण्यात मिलिंद यशस्वी झालेत तिथेच शिंत्रे पात्रांचा रंगमंचावरील वावर, नेपथ्याचा थरार वाढवण्यात उपयोग आणि घटनाक्रमाची पेरणी सांभाळून या थ्रिलरला अंगावर आणण्यातसुद्धा यशस्वी होतात.

संदेश बेंद्रे यांचा कोकणातला वाडा खूपच प्रभावशाली आहे. एकतर तो अत्यंत सहजगत्या दुमजली आहे आणि त्याला तळघर सुचक आहे जे कथानकात महत्त्वाचं आहे. बेंद्रे यांनी हे सगळं रंगमंचावर व्यवस्थित जागा उरेल याची खबरदारी घेऊन रचलं आहे. ‘इब्लिस’चा थरार वाढवण्याचं काम राहुल रानडे यांचं संगीत कसोशीने करतं. खरंतर राहुल हा आपलं नाटकाचं संगीत नकळत वाजलं पाहिजे मानणारा संगीतकार आहे. ‘इब्लिस’मध्ये त्याचं संगीत प्रकर्षाने जाणवतं आणि परिणाम साधतं. शीतल तळपदे गूढतेवर प्रकाश टाकणारं एक ब्रॅन्डेड माध्यम आहे. ‘इब्लिस’मध्ये त्यांचं काम प्रकाशमय अंधारातून दिसतं जे योग्य आणि गरजेचे आहे. महेश शेरला यांची वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची खंदी रंगभूषा ‘इब्लिस’ची दृश्यात्मक परिणामकता वाढवण्यात खूप मोलाची मदत करते.

वैभव मांगले कोकणी तात्याचं अप्रतिम अर्कचित्र सादर करतो. ‘इब्लिस’ हे नाटकाचं नाव मांगले यथार्थपणे सार्थ करतो. वैभव किती उत्तम नट आहे हे या नाटकात सिद्ध होतं. राहुल मेहेंदळे दीर्घकाळानंतर सामाजिक कपडय़ात छाप पाडतो. मांगलेंच्या विक्षिप्त म्हाताऱयाला राहुल बॅलन्स्ड सामंजस्याची वेगळीच जोड देत ‘इब्लिस’चं गूढ वाढवत जातो. या दोघांमध्ये अपूर्वा नेमळेकर आपल्या पात्राची लोभसवाणी सायकीक गूढता घेऊन उभी ठाकते आणि ‘इब्लिस’चा थरार वाढवते. अपूर्वाने आजवर केलेल्या भूमिकांमुळे ती प्रामाणिकपणे समोर येते. सुनील देव केवळ आपल्या वावराने गूढता वाढवतो.

‘इब्लिस’ हे एक सर्व साधारण प्रेक्षकांसाठी योजलेलं रंजक नाटक आहे. त्यात ते निश्चित यशस्वी आहे. हल्ली समीक्षण, परीक्षण आणि जनरली कुठेही मत देताना ते नाटक कसं आहे पेक्षा आम्ही ते कसं केलं असतं हे अधिक दिसतं. तसं असण्याची गरज नाही. ‘इब्लिस’ थरारक आहे. एन्ड ऑफ द स्टोरी.

 • नाटक – इब्लिस
 • निर्मिती – अद्वैत थिएटर्स, झी मराठी
 • निर्माते – राहुल भंडारे
 • नेपथ्य – संदेश बेंद्रे
 • संगीत – राहुल रानडे
 • प्रकाश – शीतल तळपदे
 • वेशभूषा – महेश शेरला
 • रंगभूषा – उलेश खंदारे
 • सूत्रधार – गोटय़ा सावंत
 • लेखक/दिग्दर्शक – मिलिंद शिंत्रे
 • कलाकार – अपूर्वा नेमळेकर, सुनील देव, राहुल मेंहेंदळे, वैभव मांगले
 • दर्जा – ***
आपली प्रतिक्रिया द्या