बाईकच्या चाकात पदर अडकल्याने विवाहितेचा मृत्यू; दुचाकी स्लिप होणे हा अपघातच, हायकोर्टाने मंजूर केली नुकसानभरपाई

बाईकच्या चाकात विवाहितेचा पदर अडकल्याने अपघात झाला व त्यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची तब्बल 7 लाख 82 हजार 800 रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विमा कंपनीला दिले आहेत.

चाकात पदर अडकल्याने दुचाकी स्लिप होणे हा अपघातच आहे. कारण अपघाताची नेमकी व्याख्या कायद्यात नाही. अपघात म्हणजे दोन वाहनांची एकमेकांना धडक असा तर्क लावणे अयोग्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत न्या. शिवकुमार दिघे यांच्या एकल पीठाने ही नुकसानभरपाई मंजूर केली. विमा कंपनीने साडेसात टक्के व्याज नुकसानभरपाईच्या रकमेवर द्यावे. आठ आठवडय़ांत ही रक्कम कोर्टात जमा करावी, असे आदेश न्यायालयाने न्यू इंडिया ऍशुरन्स कंपनीला दिले आहेत.

पाटील यांनी अपघात विमा काढला होता. या घटनेत दोन गाडय़ांची टक्कर झाली नसली तरी बाईक स्लिप होऊन अपघात झाला हे सत्य आहे. चौघेजण बाईकने प्रवास करत होते, असा दावा विमा कंपनीने केला असला तरी पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले बाईकवर होती. याने कोणत्याही नियमाचे किंवा विमा अटींचे उल्लंघन होत नाही, असे न्या. दिघे यांनी स्पष्ट केले.

कंपनीचा युक्तिवाद

पाटीलसह चौघेजण बाईकने प्रवास करत होते. मुळात याला परवानगी नाही. तसेच पत्नीचा पदर चाकात अडकला आणि बाईक स्लिप झाली. या घटनेत दोन गाडय़ांची टक्कर झालेली नाही. हा अपघात असल्याचे ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे नुकसानभरपाई देता येणार नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला होता.

काय आहे प्रकरण

3 ऑगस्ट 2011 रोजी ही घटना कोल्हापूर येथे घडली. रामचंद्र पाटील हे पत्नी व दोन मुलांना घेऊन बाईकवर जात होते. तेव्हा पत्नीच्या साडीचा पदर बाईकच्या चाकात अडकला. बाईक स्लिप झाली. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पत्नी दुधाचा व्यवसाय करायची. ती महिन्याला चार हजार रुपये कमवायची. तरीही अपघात दावा न्यायाधिकरणाने नुकसानभरपाई नाकारली. न्यायालयाने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी करत पाटील यांनी याचिका केली होती.