आता शहिदांचे नातेवाईक अभिमानाने छातीवर मिरवू शकणार शौर्यपदक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

येत्या 26 जुलै रोजी येणाऱया 20 व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून हिंदुस्थानी सैन्यदलाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहिदांना मिळालेले शौर्यपदक यापुढे त्यांचे जवळचे नातेवाईक अभिमानाने छातीवर लावू शकतात. काही खास प्रसंगीच त्यांना ही संधी मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश सैन्यदलाने जारी केला आहे.

आतापर्यंत लष्करी अधिकारी किंवा निवृत्ती लष्करी अधिकारीच देशसेवेसाठी मिळालेले शौर्यपदक छातीवर लावू शकत होते. मात्र शहिदांच्या कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केली होती की मृत सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांनाही शौर्यपदक छातीवर लावण्याची परवानगी मिळावी.

व़ॉर मेमोरियलमध्ये मानवंदना समारंभात तसेच, अंत्यसंस्कार प्रसंगी शहीदांची पत्नी, आईवडील, आजोबा, पणजोबा, dमुले शौर्यपदक लावू शकतात. सैनिक, लष्करी अधिकारी आपले शौर्यपदक छातीवर डाव्या बाजूला लावतात. त्यांचे कुटुंबीय फॉर्मल सिव्हिल पोशाखात छातीच्या उजव्या बाजूला पदक लावू शकतील. जर एकापेक्षा जास्त पदके असतील तर सेट वापरू शकतात.