अग्नितांडव, सोलापुरात 8 जणांचा होरपळून मृत्यू

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल टॉवेल कारखान्यात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मालक व कामगार कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

पहाटेच्या सुमारास तिघांचे तर दुपारी पाच जणांचे मृतदेह आढळले. हे सर्व मृतदेह ओळखण्यापलीकडे गेले होते. बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलातील दोघेजण भाजून जखमी झाले आहेत. ही आग जवळपास 12 ते 15 तास धुमसत होती. आकाशात धुराचे व आगीचे लोट पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण होते. कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी यांच्यासह अनस मन्सुरी (24), शिफा मन्सुरी (23), युसूफ मन्सुरी (दीड वर्ष), आयेशा बागवान (45), हिना बागवान (38), मेहताब बागवान (51), सलमान बागवान (18) अशी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

चिमुरड्याला कवटाळले

हाजी उस्मान मन्सुरी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन लपले होते. दीड वर्षाचा चिमुरडा युसूफ याला काही होऊ नये यासाठी त्यांनी मिठीत कवटाळून घेतले होते. त्याच स्थितीत ते होरपळून मरण पावले.

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतही आगीचा भडका

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा सुपर जेनेरिक्स या रासायनिक कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रविवार असल्याने कारखान्यात कामगार वर्ग अत्यल्प होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कारखान्यामध्ये फायर हायड्रंट सिस्टम असती तर आग इतकी भडकली नसती, असे कामगारांचे म्हणणे आहे.

चारमिनारजवळ आगीत 17 ठार

आंध्र प्रदेशच्या हैदराबाद येथील चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीतील दागिन्यांच्या दुकानात आज पहाटे भीषण आग लागली. त्यात 17 जणांचा मृत्यू झाला.