माथेरानच्या राणीचा ‘पाय’ पुन्हा घसरला, 16 तासांनंतर मिनी ट्रेन रुळावर

सामना प्रतिनिधी, कर्जत

तांत्रिक कारणाने नेहमीच यार्डात ‘पळणाऱया’ माथेरानच्या राणीचा पुन्हा एकदा रविवारी ‘पाय’ घसरला. 51 प्रवाशांना घेऊन नेरळच्या दिशेने निघालेल्या मिनी ट्रेनचे इंजिन वॉटर पाइपलाइनजवळ घसरल्याने पर्यटकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱया दिवशी सकाळी ही गाडी रुळावर आणण्यात यश आले. त्यामुळे माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन तासांच्या नेरळ-माथेरान प्रवासाला 20 तास लागले. या तांत्रिक लोच्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांचा चांगलाच घामटा निघाला.

माथेरान येथून 51 पर्यटकांना घेऊन नेरळच्या दिशेने निघालेली मिनी ट्रेनचे इंजिन (एनडीएम 1-405) दुपारी पावणे चार वाजता वॉटर पाइपलाइनजवळ रुळावरून उतरले. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱया प्रवाशांचे हाल झाले. शेवटी सर्व 51 प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱयांनी तीन किलोमीटर चालत घाटरस्त्यावर आणून टॅक्सीने पुढील प्रवासासाठी सोडले. त्यानंतर नेरळ लोको कर्मचाऱयांच्या टीमने तब्बल 16 तास शर्तीने प्रयत्न करून आज सवानऊ वाजता मिनी ट्रेनच्या इंजिनाला रुळावर आणले.

नेरळ-माथेरान-नेरळ हा एकच मार्ग असल्याने नेरळ येथून सकाळी माथेरानकरिता सोडली जाणारी पहिली गाडी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी नेरळ स्थानकात होती, त्यानंतर सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ येथून माथेरानकरिता निघालेली पहिली गाडी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झाली होती.
‘राणी’च्या इतिहासात प्रथमच गाडी दुरुस्तीच्या कामासाठी 16 तास नॅरोगेजवर थांबण्यात आली. पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच मिनी ट्रेनचे पुन्हा रडगाणे सुरू झाल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.