
टास्क फ्रॉडच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱया राजस्थानातील तिघा सायबर भामटय़ांना माटुंगा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपींकडून मोबाईल, सिमकार्ड, डेबिट व क्रेटिड कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, रबर स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुकन्या परब (26) यांना इन्स्टाग्राम खात्यावर अॅमेझॉनची एक जाहिरात आली. त्यावर क्लिक केले असता त्यांना एका व्हॉट्सअॅपधारकाने सुकन्या यांना एका कंपनीसाठी पार्ट टाईम जॉब करणार का, अशी विचारणा केली आणि त्यांनी एक लिंक पाठवली. त्या लिंकवर सुकन्या यांना त्यांचा एसबीआय बँकेचा खाते क्रमांक नोंदविण्यास भाग पाडले. त्यानंतर सुकन्या यांनी त्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांचे टेलिग्रामवर एक खाते सुरू झाले. मग त्याआधारे तांत्रिक माध्यमांचा वापर करत सुकन्या यांच्या बँक खात्यातील एक लाख 22 हजार रुपयांचे रक्कम वळती करून घेतली. तक्रारीनंतर वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिगंबर पगार तसेच संतोष पवार आणि मंगेश जऱहाड या पथकाने तांत्रिक अभ्यास करून सूरजसिंग भैरवसिंग (31), देवीसिंग रावल (36) अशा दोघांना शीवमध्ये पकडले. दोघांच्या चौकशीत विनोदकुमार अग्रवाल या तिसऱया आरोपीचे नाव समोर आले. तो विमानाने मुंबईला असल्याची माहिती मिळताच त्याला विमानतळावर पकडण्यात आले.


























































