
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पालिकेच्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली. यावेळी महापौरांनी पीपीई कीट घालून रुग्णांशी संवाद साधून या ठिकाणच्या आरोग्य सुविधेचाही आढावा घेतला. यावेळी बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे हेदेखील उपस्थित होते. वाढत्या रुग्णंसख्येने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, मात्र कोरोना खबरदारी निश्चित घ्यावी, असे आवाहनही महापौरांनी यावेळी बोलताना केले. बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये 2500 बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये 108 आयसीयू बेड आहेत. तर 12 डायलिसीस बेड आहेत. त्याचप्रमाणे 1360 बेड हे विनाऑक्सिजन तर 900 ऑक्सिजन बेड असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणी सद्यस्थितीत 950 रुग्ण दाखल असून यातील 280 रुग्ण ऑक्सिजन बेडवर तर 670 रुग्ण विनाऑक्सिजन बेडवर दाखल असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.





























































