
लावणी ही मराठमोळ्या संस्कृतीची ओळख. ढोलकी- हलगीचा आवाज कानावर पडला की, मराठी माणसाचे मन नाचू लागते. ढोलकीची थाप, घुंगरांचा आवाज आणि प्रेक्षकांच्या टाळ्या-शिटय़ा यांनी भारलेले वातावरण काही औरच असते. हरी पाटणकर यांच्या संकल्पनेतील लावण्य दरबार हा कार्यक्रम असाच सध्या धुमाकूळ घालत आहे.
प्रसिद्ध लावणी नृत्यांगना मेघा घाडगे हिच्यासह कविता घडशी, आकांक्षा कदम, चांदनी देशमुख, अंबिका पुजारी, स्मिता कांबळे या लावण्यवतींनी लावण्य दरबार सजवलेला आहे. नुकताच पु. ल. देशपाडे कला महोत्सवात लावण्य दरबार कार्यक्रम सादर झाला. त्याला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. सहपरिवार पाहावा असा घरंदाज लावणी कार्यक्रम आहे, अशा प्रतिक्रिया रसिक प्रेक्षकांनी दिल्या.
खरं तर लावण्य दरबार हा कार्यक्रम 2018 साली नव्या रूपाने प्रेक्षकांसमोर आला. लॉकडाऊनमध्ये हा कार्यक्रम थांबला. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर नाटय़गृहे सुरू झाल्यानंतर लावण्य दरबारचा धडाका पुन्हा सुरू झाला आहे, अशी माहिती हरी पाटणकर यांनी दिली.
लावणीच्या विविध नृत्याविष्काराने हा कार्यक्रम सजला आहे. रविवार, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता दामोदर नाटय़गृह परळ आणि 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे लावण्य दरबारचा प्रयोग होणार आहे.
























































